Monday, August 9, 2010

खड्डा व माझा अन तिचा पत्रव्यवहार !

उघडलाच ना लगेच हा ब्लॉग !! . सगळी कामे बाजूला ठेवून !


त्यात तुमचा दोष नाही ! लोकांचा पत्रव्यवहार म्हणजे बर्याच जणांची उत्सुकता शिगेला पोहोचते. त्यात जर तो "त्याचा" अन "तिचा" असेल तर! मग बोलूच नका. यात तुमचा काही दोष नाही. वाचकांचा पत्रव्यवहारही बरेच लोकं मिटक्या मारत वाचतात! पण हा तुम्हाला वाटतो तसा प्रकार नाही. हा माझा अन जिला तुम्ही अनेक स्वरूपात पाहिलेलं अन अनुभवलेले आहे त्या सर्वशक्तिमान 'सरकारी यंत्रणेचा' पत्रव्यवहार आहे!

(अर्थातच हा सर्व पत्रव्यवहार काल्पनिक आहे! लोकांच्या किरकोळ अडचणींनी युक्त पत्रांना तत्परतेने अन एव्हढा प्रदीर्घ काळ उत्तर देण्यायेव्हढा वेळ सरकारी यंत्रणेकडे नाही. शिवाय आपल्या पत्र खात्यानेही अशी तत्परतेने पत्रांची ने-आण केल्याचे ऐकिवात नाही . असल्या पत्रांना उत्तर देण्यापेक्षा सरकारी अधिकारी त्यांचा वेळ लोकांच्या अडचणी प्रत्यक्ष सोडविण्यात जास्त खर्च करतात ! काहींच्या मते लोकांसाठी नवीन अडचणी तयार करण्यात !!! जरी बहुतांशी सरकारी हाफिसातील कोनाड्यात कबुतरांनी आपली वसाहत वसवली असली तरी, पत्रांबाबत उलाढाल करणारी ती जमात अन ही पत्रांची ढाल करणारी सरकारी जमात वेगळी!! सरकारी लोक फार तर कबुतराना हाकलायला कधीतरी "कबुतर, जा.. जा.. " म्हणाले असतील. (ते ही वरून एखादा आदेश आल्यावर अथवा कोणी मोठा सायब येणार असल्यावार). किंवा लोकांना एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीकडे "जा जा " म्हणत असतील .. पण ती तत्परता वेगळी अन ही पत्रोत्तारातील तत्परता(!!) वेगळी .. तर मूळ मुद्दा असा कि एव्हढ्या शुल्लक प्रश्नावर एव्हढा प्रदीर्घ,मुद्देसूद (?) पत्रव्यवहार करण्याइतका वेळ ,पैसा,मनुष्यबळ अन साधनसामुग्री सरकारकडे नाही .)

खरे तर ही पत्रे एका पेक्षा जास्त वर्षाच्या कालावधीत लिहिली गेली आहेत. पण ही दरवर्षीची रडारड असल्याने मी प्रत्येक पत्राच्या वरती तारीख लिहायचे टाळतोय . थोडा संदर्भ यावा म्हणून वाटल्यास फक्त महिना वरती लिहितो !कारण ह्या खड्ड्यांना काल,वेळ ,रस्ता-महामार्ग, पाउस उन, लांबी -रुंदी कशाचेही बंधन नाही.. ते काल होते, आज आहेत अन उद्याही असणारेत .. शिवाय कोणी तरी पुण्याच्या खड्ड्यांच्या बाबतीत म्हणालेच आहे ना, कि पुण्याच्या बाबतीत दोनच गोष्टी शाश्वत आहेत.. खड्डे... एक ते पुण्याच्या रस्त्यातील आणि दुसरे पुणेरी बोलण्यातील. कधी, कोणी , त्यात कसे फसेल कळणार पण नाही..

नेमेची येणारया पावसाबरोबर, बेडकासारख्या अचानक उगवणार्या खड्ड्याबद्दल माझा सरकारी यंत्रणेशी जो सुखसंवाद झाला तो असा !


मे महिना अखेर..
पहिला पाउस, सोसाट्याचा वारा , भारनियमन करण्याच्या (आयत्या चालून आलेल्या ) संधीचा फायदा घेवून केला गेलेला अंधार, घरोघरी तळलेल्या गेल्या भज्यांचा मस्त दरवळ. लहान मुलांचा "ये रे ये रे पावसा " चा कल्लोळ.
आणि ह्या बरोबरच मग पुण्यातल्या रस्त्यारस्त्या वर धावणारया पाण्याने साफ(!!) केलेल्या रस्त्यांवर रेखाटली जाते ही खड्ड्यांच्या ठिपक्यांची रांगोळी.. अन मग नंतर काही दिवसातच, मान्सूनचा पाउस आणि महापालिकेचा रस्ता दुरुस्ती विभाग ह्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हीच काही ठिपक्यांची रांग बनते महारांगोळी!!


जून महिना . दुसराच आठवडा.
मी पहिले पत्र लिहितो..

प्रति,
मा. अधिकारी.
रस्ता दुरुस्ती विभाग,
पुणे महापालिका .

स.न.वि.वि.,
नुकत्याच झालेल्या पावसाने आमच्या प्रभागातील रस्त्यांमध्ये फार खड्डे पडले आहेत.. तरी कृपया ह्या खड्ड्यांची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत. ही नम्र विनंती.
आपला नम्र,
अ.
पुणे

दहावी परीक्षेनंतर मराठीत पत्र लिहायची सवय गेल्याने, पत्र लिहायचे म्हणाले कि पोटात एक खड्डा (पुण्यातील रस्त्यांपेक्षाही मोठा ) पडतो!!
त्यामुळे वरील पत्र हे फार त्रोटक झाल्याचे आपण जाणले असेलच.. ते त्रोटक होण्यामागे माझ्या मुद्देसूद लिखाणापेक्षा पत्रात काय लिहायचे हा मोठा प्रश्न होता. आणि शाळेत बहुधा "छोट्या रमेशला शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्याबद्दल " अथवा "आजी-आजोबाना, सुट्टीवरून पुण्याला सुखरूप पोहोचलो असे पत्र लिहा " अश्या स्वरूपाची पत्रे लिहिल्याने सरकारी अधिकार्याला पत्रात नक्की काय काय लिहायचे हा प्रश्न म्हणजे " रस्त्यातील नक्की कोणता कोणता खड्डा चुकवायचा? ( किंवा खड्ड्यातला नक्की कोणता रस्ता पकडायचा )" यासारखा एक मोठा प्रश्नच होता. सुरुवात "पत्रास कारण कि " अशी करायची का किंवा शेवट "लहानांना आशीर्वाद व मोठ्यांना नमस्कार.. " असा करायचा का? असे बरेच प्रश्न रस्त्यातील झाकण नसलेल्या मॅन-होल प्रमाणे आ वासून पसरले होते ..


जून शेवटचा आठवडा ..

पहिल्या पत्राला तत्पर उत्तरही मिळाले !

प्रति.
श्री अ.
पुणे,

आपण विनंती केल्याप्रमाणे सदरहू खड्डा हा तत्परतेने बुजवला जाईल. परंतु इथे नमूद करण्यात येते कि आपण विनंती केल्यानुसार खड्ड्याची दुरुस्ती करणे शक्य नाही. आमच्या विभागाच्या कार्यकक्षेत फक्त रस्त्याचीच दुरुस्ती केली जाते.
आपणास विनंती करण्यात येते कि आपण फक्त सदरहू खड्ड्याची जागा अन आकार व्यवस्थित नमूद करा .
आपण दाखावीत असलेल्या जागरुकतेबद्दल धन्यवाद . महापालिका आपलीच आहे. आपण तिचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी अशीच जागरूकता दाखवत जा.

धन्यवाद,
श्री ठिगळे ,
अभियंता,
रस्ता दुरुस्ती विभाग,
पुणे महापालिका.

ता. क. :- रस्त्यावर होणार्या संभाव्य अपघाताविषयी आमच्याकडे पत्रव्यवहार करू नये..

----------------------------------------------------------------------------------------

क्रमश:
पुढचा भाग लवकरच.. (लवकर म्हणजे जितक्या लवकर नवीन केलेला रस्ता उकरला जातो तितक्या लवकर .. )

No comments:

Post a Comment